Tuesday, 28 October 2025

डिजिटल दिवाळी


            दिवाळी ही खरी एकत्र येण्याची असते. एकमेकांना वेळ देता आला, गप्पागोष्टी झाल्या, सुखदुःखे वाटली गेली की दिवाळी साजरी होतेच. यामुळे दिवाळी ही वर्षातून अनेकवेळा साजरी होऊ शकते. पण ती न साजरी होण्याची कारणे अनेक आहेत. हेवे-दावे-दुरावे, परस्पर स्पर्धा, इर्षा आणि यामुळे संवाद न होणे अशी काही कारणे आहेत. एखाद्या वाक्यातील गर्भित अर्थ किंवा मतितार्थ लक्षात न घेणे हे देखील एक कारण आहे. याला कारणीभूत ठरतो तो पूर्वग्रह. एकाने बोललेले एखादे वाक्य त्यातील चांगला वाईट उद्देश लक्षात न घेता स्वतःच्या पूर्वग्रहाने, आकलनाप्रमाणे वेगवेगळे अर्थ बांधले गेले कि संपलेच! अर्थाचा अनर्थ व्हायला फार वेळ लागत नाही. यामुळेच एखाद्या वाक्यातील तिखटपणापेक्षा त्यामागचा उद्देश किंवा हेतू लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे.

        सध्याच्या डिजिटल युगात हे तर अधिकच अवघड होऊन बसले आहे. कारण पूर्वीच्या काळी किंवा ज्यावेळी आपण एकमेकांना समक्ष भेटतो आणि बोलतो, तेव्हा चर्चेतला, संवादातला स्वर आणि भाव लक्षात घेणे सोपे जाते, यातून गैरसमज होण्याचा धोका कमी होतो. फेसबुक आणि Whatsapp च्या जगात हे खूप अवघड होऊन बसले आहे, कारण इथे फक्त वाक्य दिसते, बाकी त्यामागचा भाव आणि हेतू हा वाचणारा माणूस त्याच्या मताप्रमाणे, आकलनाप्रमाणे लावू शकतो. यामुळेच सध्या whatsapp सारख्या ग्रुपवर अनेक तंटे होताना दिसतात, रुसवे फुगवे वाढतात. एखादी फॉरवर्ड केलेली पोस्ट किंवा स्वतःहून काहीतरी लिहलेले एखाद्या ग्रुपवर टाकल्यानंतर, पोस्ट करणाऱ्याच्या मनात जरी काही उद्देशपूर्ण किंवा जाणीवपूर्वक नसेल तरीही मोठ्या ग्रुपमधील १ - २ व्यक्ती तरी याने किंवा हिने हे माझ्याबद्दलच पोस्ट केलं आहे असा अर्थ लावू शकतो. तिथून पुढे तो मनात तेढ धरून राहतो आणि याचा बदला कसा घेता येईल याचा विचार करत राहतो. बऱ्याचदा पोस्ट करणाऱ्याच्या मनात तसा काही उद्देश नसतो. आणि जी माणसे खरोखरच असे काही हेतुपुरस्पर करतात ती मनानेच वाकडीच असतात यामुळे यांचा आपण विचार करणेच चुकीचे आहे आणि स्वतःच्या आरोग्यासाठीही ते अपायकारक आहे. यामुळेच सध्या अश्या प्लॅटफॉर्मवर खूप जपून लिहावं / पोस्ट करावं लागतं, कुणाचं मन दुखावलं जाऊ नये याची विशेष काळजी घ्यावी लागते. कुणाचं बोललेलं, लिहलेलं, पोस्ट केलेलं स्वतःच्या जिव्हारी न लावून घेणं हेही एक कसब आहे आणि ही कला आत्मसात करून घेणं अत्यंत आवश्यक आणि फायदेशीर आहे.

        जुन्याकाळची दिवाळी हि खरंच छान होती कारण इथे पैस्याचा अवास्तव फोफाटा नव्हता, घराच्या बनलेल्या फराळातच सुख दिसायचे. हल्ली बाजारातून वेगवेगळ्या मिठाई, गुलाबजामून, बासुंदी इत्यादी गोष्टी केव्हाही घेता येतात, म्हणून घरी या एकत्रपणाने बनवलेले लाडू, चिवडा, पेढा,  कानुला (करंजी), चखली इत्यादी यांचा मान थोडा हरवला असेल. खूप जास्त फटाके लावण्यापेक्षा, खूप महाग कपडे घालण्यापेक्षा, एकमेकांना काहीतरी देण्यामध्ये आणि एकत्र येण्यामध्ये आनंद जास्त आहे हे उमगले पाहिजे. आमचं - तुमचं करत रहाणे हा एक मोठा रोग आहे आणि या रोगामुळे आपुलकी आणि जिव्हाळ्याचा जीव जातो, हे सत्य आहे. येणाऱ्या भविष्यात आपण सर्वजण एक उत्तम, आनंदमय, जिव्हाळ्याची, प्रेमपूर्ण आणि अर्थपूर्ण अशी दिवाळी साजरी करू शकू अशी इच्छा आणि प्रार्थना करतो.

12 comments:

  1. Very good 😊.

    ReplyDelete
  2. "वा ! खूप छान..👌🏻✨

    ReplyDelete
  3. Ab Rulayega kya...

    ReplyDelete
  4. < दिवाळी ही एकत्र येण्याची असते >
    एकत्र येणे आणि मनाने, प्रेमाने, मायेने आणि जवळकीच्या नात्याने एकत्र येणे यात खूप अंतर आहे. एकत्र येऊनही तुम्ही मोबाईल घेऊन खाली मान घालून बसत असाल, तर ते एकत्र येणे नव्हे. तो जुलमाचा रामराम होय.
    < ती अनेकवेळा साजरी होऊ शकते >
    मग त्यात पांडव पंचमी असणार नाही, धनत्रयोदशी, नर्कचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा भाऊबीज असणार नाही. त्या त्या दिवसाचे ते ते भाव असणार नाहीत.
    < व्हॉट्स ॲप ग्रूपवर अनेक तंटे होतात. > सोशल ग्रुप्स हे आभासी ग्रुप्स आहेत. खरं तर जे दोन व्यक्ती समोरासमोर व्यक्त करू शकत नाहीत, ते व्यक्त होण्याचा हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. तिथे आपले नाव नसेल तर शक्यतो कोणी वैयक्तिक घेऊ नये. जेंव्हा नाव असते, तेंव्हा व्यक्त होण्याच्या लिखाणात, बोलण्यात दहा टक्के जरी तथ्यांश असेल तर वाचणाऱ्याने किंवा ऐकणाऱ्याने अंतर्मुख होऊन आपली (१०%) चूक सुधारणे उचित होय. हा खूप मोठा विषय आहे.

    असेच व्यक्त होत राहा. नुकसान मुळीच होणार नाही.

    ReplyDelete
  5. होय, बरोबर आहे. पूर्वी एकत्र परिवार, दोन चार लोक, नोकरी निमित्य बाहेर, मुले शिक्षणासाठी बाहेर, दिवाळी सुट्टीला आली की, सर्व धमालच, नवीन कपडे, फराळ यात खूप समाधान असायचे.
    आता कुटुंब व्यवस्था बदलली, दिखाऊ पणा वाढला, मोबाईल चा जमाना, त्यामुळे गैरसमज वाढले. आणि आपलें पणा दूर गेला. प्रेम आपुलकी कमी झाली.

    ReplyDelete
  6. *डिजिटल दिवाळी हे लेखन खूप सुंदर झाले आहे. आपल्या लेखनातील जनरेशन गॅप हा विचार घेणे खूप गरजेचे आहे कारण असेल की पूर्वग्रहदूषित वगैरे वगैरे याचे कारण असे आहे अर्थ लावून घेणे ज्याच्या त्याच्या ओरिजनल स्वभावावर अवलंबून असते असो लिखाण मनापासून आवडले कौतुक करावे तेवढे कमी आहे धन्यवाद धन्यवाद*

    ReplyDelete
  7. खूप छान!!

    ReplyDelete
  8. Khup chan mandla aahe
    Happy Diwali

    ReplyDelete
  9. सुंदर

    ReplyDelete