Thursday, 30 December 2021

चाटण


काय बोलावं या वर्षाबद्दल, २०२१ हे साल माझ्यासाठी नक्कीच अविस्मरणीय असे राहणार आहे. संपूर्ण वर्षभरात आंबट, तिखट, गोड, खारट, तुरट अशा नानाविध चवी या वर्षाने मला खाऊ घातल्या, नव्हे त्या चाटवल्या. काही अत्यंत जहाल तर काही तितक्याच मधाळ. वर्ष सुरू होण्या थोडंसं आधीच एक भला मोठा चमचा माझ्या घश्यात काहीतरी भरवून गेला. विषच ते, चव समजण्या आधीच संपूर्ण जीभ पोळून निघाली आणि पोटात तर वणव्यानेच पेट घेतला. नाक, तोंड आणि डोळ्यातून पाणी येत असतानाच, कुणी भरवला असेल तो घास म्हणून शोधायला गेलो तर विधिलिखिताचा एक अस्पष्ट, अदृश्य असा हात त्या चमच्यामागे मला दिसला. जवळचे म्हणजे माझ्या अगदी जवळचे लोक हातात पाणी घेऊन माझ्या दिशेने धावले, नुसत्या पाण्याने थंडावेल असे ते जहरच नव्हते..त्यांचे भाजलेले हातही मला दिसत होते. जीवाचा आटापिटा करून ते सारं पचवायचा आणि थंड करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या विषाला शरीराच्या आतच घुसमटून दामटून टाकले. पुढील काही महिन्यात असे समोरून येणारे, न आवडणारे, न पटणारे, मनाला हैराण करून सोडणारे, जहरसदृश्य चमचे यायचे काही थांबले नाहीत. प्रत्येक चमच्यासोबत ते विधिलिखित मला विचारीत होते "हे पचवू शकशील ?" मी माझ्या शरीरातील शक्ती एकवटून काही पाचकरस शरीरातच उत्पन्न केले, ते म्हणजे होते, आशा, धीर, हिम्मत, सहनशीलता, विवेक आणि निश्चय. या रसांपुढे आणि माझ्या मदतनीसांच्या प्रयत्नांपुढे ते हलाहल अखेर वितळले आणि सहा महिन्यांचा तो तिखट, असहनीय, बैचेनीपूर्ण, जीवाची काहिली करून सोडणारा, प्रदीर्घ असा भासणारा तो विषारी कालावधी अखेर संपला आणि त्या हलाहलाचीच शेवटी साखर झाली आणि माझ्या जीवेवर रेंगाळली.

पुढील सहा महिन्यात माझ्या उपेक्षित आणि जखमी जीभेवर खूपसारी मलमपट्टी झाली. चमच्यातून येणारे जिन्नस बदलले होते आणि विषाची जागा अखेर मधाने घेतली. मी आता डोळे पुसून, त्या चमच्यामागे पुन्हा एकदा निरखून पाहू लागलो तेव्हा मला तो निर्भाव, अविचल आणि एरवी चेहऱ्यावर कसलेच भाव न दाखवणारा, पाषाणस्वरूप विधिलिखिताचा चेहरा नकळत स्मितहास्य करत असल्यासारखा भासला ! आता हे वर्ष पाठमोरे होत असताना, अगदीच काही त्याचा हात पकडावा, त्याला उराशी कवटाळावे...आणि  'इतक्यात जाऊ नकोस रे बाबा.. !' असे हट्टून सांगावे असे काही वाटत नाही. पण याने मला देऊ केलेले हे तिखटगोड 'चाटण' लक्षणीय अर्थाने तर्हेवाईक होते आणि ते माझ्या स्मरणात कायम राहील.

14 comments:

  1. आयुष्य जगत असताना खऱ्या अर्थाने काही चढ उतार आयुष्यात येतच असतात....त्यातून सावरत आयुष्य जगणे ही सुधा एक कला आहे....ही कला ज्याला अवगत होते त्याला सगळेच समोर येणारे चमचे मग एकसारखे भासू लागतात...!! सुंदर लेखन.

    ReplyDelete
  2. आयुष्याच्या नाजूक वळणावरच्या कडु गोड आठवणींचा सरत्या वर्षात आलेल्या अनुभवांची प्रतिभा खुपच छान मांडली आहे अनुभव तर सगळेच घेत असतात परंतु त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन फारच थोड्यांना लाभतो आणी मांडण्याची प्रतिभा अतिशय सुंदर लेखन

    ReplyDelete
  3. वा बळवंतराव वा !!

    ReplyDelete
  4. A very good attempt! लिहिण्याचं सातत्य असू दे. तू चांगले लिहितोस. उद्या नवीन वर्षाचं स्वागत कर....

    ReplyDelete
  5. मस्तच लिहिले आहेस रे

    ReplyDelete
  6. Very nice...Aakash.. well said about the year.. but still the situation is not so repaired..

    ReplyDelete
  7. आयुष्यात चढ उतार येत राहणार,
    सुखं दुःखाचा लपंडाव चालूच राहणार...

    विष मधाचे प्याले सुध्दा परत येणार,
    आकाशमध्ये ते असेच अलगत विरूनही जाणार 🙂


    आयुष्याच्या प्रवासात अशी विविध चाटण तुझे आयुष्य बेचव होण्यापासून वाचवतील... पुढील प्रवासासाठी विधात्याचे स्मितहास्य तुझ्या पाठीशी सदैव राहो हीच सदिच्छा 🙏🏻








    ReplyDelete
  8. आपल्याला तर खूप आवडले इतके आवडले की वाचता वाचता कधी संपले ते समजलेच नाही पुढल्या वेळी थोडे जास्त लिहाल आणि आम्हाला आणखी भरपूर वाचायला मिळेल एवढीच अपेक्षा आहे
    पुढील वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  9. अतिशय सुंदर!
    आयुष्यात चढ उतार येतच असतात, त्यातुनच पुढे पुढे जात राहायचे असते, साथ देणारी ही भरपूर भेटतात.

    खुप छान .

    ReplyDelete
  10. खूप सुंदर

    ReplyDelete
  11. https://m.facebook.com/story.php?story_fbid=1323637468059670&id=100012402884156

    वादळं येतात आणि जातात . दिवस मावळतो, गडद अंधार पडतो, प्रचंड भीती वाटते, पुन्हा झुंजूमंजू होते, उजाडते ! आपण सुखदुःखात, प्रेम-द्वेषात, प्रकाशात-अंधारात, सूर-असुर अशा द्वैतात जगतो. आपल्या मनात देखील हे द्वैत असतेच. त्यामुळे 'जे दिसतेय तेही जाणार आहे, कायमचे राहणार नाही याची खूणगाठ मनात पक्की बांध. आजचा मध उद्याचा मद्याचा घोट असू शकतो व तोही शहाण्याला वेडं करू शकतो ; असं हे जग आहे व या जगातील जगणं देखील असंच आहे. म्हणून "सुखदुःखे समे कृत्वा ..." स्थितप्रज्ञ आचरण असावे. मनाला त्यानुसार घडवावे . उजाडणारा व मावळणारा दिवस या जगातील सुखदुःखाचे ढंग बघून मुळीच विचलित होत नाही. तुम्ही तरुणांनी या वयातच ज्ञानेश्वरी वाचावी व आचारावी. नंतर खूप उशीर झालेला असतो. आमच्या वेळी आम्हाला हे सांगणारे कोणी नव्हते ! असो . आनंदी राहा. आईबाबांना अंतर देऊ नका. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा,आनंदाचा व स्वास्थ्याचा असू दे! त्यासाठी वर्षभर वेळ न लागू दे ही शुभेच्छा !

    ReplyDelete
  12. सर्वांनी वेळ काढून हे वाचलं.. सर्वांचे आभार.. 😇🙏🏻

    ReplyDelete