Sunday, 17 May 2020

आपत्तीची देणगी !


आज मनुष्याकडे कश्याची कमतरता आहे ? किती बलशाली आणि बलाढ्य आहे हा इतरांच्या तुलनेत! समुद्रावर जमीन अंथरून यावर आपली वसाहत निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे याच्यात. फक्त वीटेवर वीट रचून गगनाच्या काळजात घुसणाऱ्या इमारती यानेच तर बनवल्या. याच्या भ्रमण मार्गात आडवा आलेला पर्वत देखील भेदून, पोखरून अलीकडून पलीकडे क्षणात पोहोचला हा! नुसत्या गुरगुरण्याने अंगाचा थरकाप उडवणारा वाघ, सिंह यासारख्या हिंस्र श्वापदांना नुसत्या बोटांच्या इशाऱ्यावर याने रिंगणात नाचवले! क्षणात शहरेच्या शहरे उध्वस्त करू शकणारी स्फोटके आहेत याच्याकडे. शेकडो मैलो दूर केवळ शुभ्र ठिपक्याप्रमाणे दिसणारा चंद्रसुद्धा पादाक्रांत केला याने! इतकेच काय करोडो मैल दूर उघड्या डोळ्यांनीही न दिसणाऱ्या मंगळाला सुद्धा धडक दिली याने ! एवढे सामर्थ्य असून देखील आज हा महापराक्रमी योद्धा डोळ्यानीही दिसू न शकणाऱ्या छुद्र विषाणू समोर हतबत का बरे व्हावा? निसर्गाने एक छोटासा कारनामा केला आणि त्यापुढे या सर्वश्रेष्ठ, महापराक्रमी, सर्वशक्तिशाली मानवाला आपल्या बिळात दडून बसण्यास भाग पाडले! निसर्गाने दाखवून दिले कि, हा मानव जो भूतलावर ज्या ज्या गोष्टी करतो आणि ज्यांना तो पराक्रम म्हणून मिरवतो, त्या सृष्टीच्या तुलनेत केवळ अंशमात्र आहेत. हाच तो धडा, जो मानवाला इशाऱ्याने सांगत आहे कि तो स्वतः निसर्गापेक्षा मोठा होऊ शकत नाही ! हाच तो कारनामा कि जो माणसाच्या बेफिकीर आणि दिशाहीन वाटचालीत धुंद आणि मश्गुल झालेल्या डोळ्यांना आज डोळस होण्याची ताकीद आणि संधी देत आहे.

लॉक डाउनचा काळ आज आपणास अनेक अर्थपूर्ण उकली करून देत आहे. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि आयुष्यात अकल्पनीय गोष्टीही घडू शकतात याचे भान दिले. ज्या रोजच्या मळकटलेल्या वाटेवरून आपली रडतखडत पायपीट सुरु आहे, ज्यातून आपली कधीही सुटका नाही अशी तक्रार आणि समजूत जी आपण आजवर केली, तीही बदलायची वेळ या वेळेने आणली ! इतका मोठा बदल होऊ शकतो हे कोणाच्या ठायी कधीही नव्हते ! बदलत्या वेळेसोबत आपणही योग्य ते बदल अंगिकारले पाहिजेत हेही यातून समजले. काही बदल जसे कि, शहर आणि गाव यातील खोलाच खोल वाढत चाललेली दरी, यातील समतोलतेचा अभाव आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या या आजाराने निदर्शनास आणून दिल्या आहेत. गावाकडील लोकांची रोजगारासाठीची शहराकडे धाव आणि शहरातील लोकांची कोंदटलेल्या श्वासातून मुक्ततेसाठी गावाकडे धाव, हि पळापळ थांबवणे अत्यावश्यक आहे.

आणखी एक उकल म्हणजे, आपल्या अमर्याद आणि अनावश्यक गरजांचा जो भ्रम आपण निर्माण करून ठेवला आहे, तो केवळ भ्रमच आहे. हि म्हणजे चालू घडीतील लोक जे करत आहेत त्याचे जसेच्या तसे अनुकरण करण्याचा अट्ठाहास आणि निरर्थक धडपड आहे. वास्तविक आयुष्य जगण्याच्या गरजा किती कमी आहेत! पण नाही! आपली हाव अशी आहे कि, जे भवतालचे उपभोगत आहेत ते आपणही भोगलेच पाहिजे. कुणी अमका परदेशी फिरतोय तर मलाही फिरलेच पाहिजे. कोणी अमुक काहीतरी खातोय, ते केवळ नजरेने चविष्ट दिसणारे पक्वान असले आणि शरीरास त्याचा उपयोग नसला तरी, ते मीही गिळलेच पाहिजे. अश्या अनेक गोष्टी! हे करण्यात काही चुकीचे आहे असे नाही, पण या अनुकरणासाठी, नकलीसाठी आपण कोणत्या गोष्टी पणाला लावत आहोत, हे पाहायला नको का !

उत्क्रांतीने बरीच वर्षे मेहनत घेऊन आपणास पशु पासून माणूस बनवले, समज आणि संवेदना दिली, तरीही आपल्या आहारात आपण पशु आणि रानटी वृत्तीच दाखवली, निसर्गात उपलब्ध असलेल्या सर्वच गोष्टी-जीव माणूस पचवू शकत नाही हे त्याने दाखवून दिले आहे. आता मात्र उपचाराच्या वाटेवर कबुतराच्या चोचीप्रमाणे एक एक कण आपण निवडून खाऊ लागलो आहोत ! शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज, त्यासाठीचा समतोल आहार आणि आवश्यक व्यायाम याचे धडे आपण घेऊ लागलो आहोत.

आज आपण त्या लोकांशी संवाद करत आहोत, ज्यांच्याशी आपणास बोलण्यासाठी पुरेसा वेळ नाही हि सबब आपण नेहमी पुढे केली ! क्षुल्लक बाबी मनात ठेवून अबोला केला, यामध्ये मग मित्र परिवार, नातेवाईक, मग वडील, आई, भाऊ, बहीण आणि इतर यांच्यातील आजवर दुर्लक्षित आणि अव्यक्त संवाद आणि नात्यांतील मर्म याची जाणीव झाली आहे. कोरोनाकडून महत्वाचा शिकण्याजोगा गुण म्हणजे, हा विकार गरीब-श्रीमंत, जातीपाती, वय, लिंग, पत-प्रतिष्ठा यामध्ये दुजाभाव करत नाही, हे पाहून सर्वच लोकांनी समान पातळीवर येऊन एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, आणि आपण आता तसे करतही आहोत.

मनोरंजन हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक आणि अविभाज्य घटक असला तरी, आज जाणीव होते कि, आपल्या स्वतःच्या आयुष्याची पटकथा रंजक बनवण्या ऐवजी आपला कितीतरी वेळ आपण सिनेमाच्या कल्पित पटकथा पाहण्यात घालवला! स्वतःच्या व्यक्तिमत्वात पैलू घडवण्या ऐवजी social media वरील रंजक आणि फायदा शून्य बाबींत मन रमवले, यातून आपण खरे काय कमावले ? तंत्रज्ञान आणि ही अनेक प्रसारमाध्यमे मुळीच दुष्ट नाहीत, पण याचा अतिवापर न करता समंजस उपयोग करणे गरजेचे आहे. लॉक डाउनच्या निमित्ताने आपणाला मिळालेली हि फुरसत म्हणजे आपणासाठी आवाहन आहे अश्या प्रकारच्या आपणास हानिकारक आणि अनावश्यक सवयी त्यागण्यासाठीचे, हि आपल्या विशुद्धीकरणाची सुवर्णसंधी आहे.

मुळात कोणताही आजार हा रोग्याला दुर्बल बनवतो आणि आपण आजारातून 'बरे' होतो, पण हा कोरोना नामक आजार माणसाला मानसिक, सामाजिक आणि जीवनाविषयीच्या विविध अंगांवर 'बरे' करत आहे. इतर सर्व भ्रमिक गोष्टींपेक्षा आपले जीवन हे अधिक मोलाचे आहे, हे तो शिकवत आहे. या आजाराकडे शिकवण्याजोगे खूप आहे, यातील किती आणि कोणत्या गोष्टी शिकायच्या हे आपल्या हातात आहे.

19 comments:

  1. Yes, it's truth.well done.

    ReplyDelete
  2. Sundar likhan 👌....agreed 👍

    ReplyDelete
  3. आपत्तीची देणगी, छान लिखाण !
    मानव प्रत्येक संकटातून च काहीतरी शिकत आला आहे, व यातूनही तो काहीतरी बोध नक्कीच घेईल. शेवटी निसर्गापुढे मानव शून्यच आहे

    ReplyDelete
  4. Its true, but human being infellectul will win this within 6 more months and again it will be business as usual. Human as humanity care for each other and love senior citizens so following lockdown. Yes its punishment for all for unnatural eating of few asians. But its true, with some rest , everyone in f amilies came relatively closure in this dasaster, pollution down and doctors, police and goverment actually workings for people proving themselves for society. Its gift from this disaster to Indians!

    Nice writing Akash! keep it up!

    ReplyDelete
  5. सुंदर लिखाण आहे.

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर

    ReplyDelete
  7. पटलंय ❣️

    ReplyDelete
  8. खूप छान लिखाण. या कोरोनामुळे आपण कुठे आहोत, निसर्गाचि शक्ती किती अफाट आहे याचे दर्शन झाले. यातूनच समस्त मानवजातीला योग्य संदेश मिळाला. धन्यवाद !!!

    ReplyDelete
  9. खूप सुंदर लेख

    ReplyDelete
  10. सुटसुटीत पण मुद्देसूद! लिखाण चालू राहू दे मित्रा!👍

    ReplyDelete
  11. खुप छान लिखाण,प्रबोधयन्

    ReplyDelete
  12. Hi,

    कोरोनाबद्दल आणि याने आपल्या समाजात होणार्‍या बदलांविषयी चांगली चर्चा.

    Regards
    Akhilesh

    ReplyDelete
  13. कोरोना संसर्ग हे मानवनिर्मित संकट मानवाने सुड बुध्दिने किंवा असुरी विचारांचा होणारा अतोनात वापर फोफावलेला चंगळवाद निसर्गाने जर एखादे संकट आणलेच तर ते नष्ट करण्याचे सुध्दा सामर्थ्य निसर्गाच्या हाथात असते विज्ञान अतिरेकी विचारांच्या अधीन झाल्याचे जे आपण आज परीणाम भोगत आहोत ह्या मधुन बर्याच गोष्टींचा तोटा झाला.तसा फायदा. सुध्दा झाला विनाकारण चे खर्च टळले कुटुंबासाठी नसणारा वेळ मिळाला जिवन कशासाठी जगायचे असते ते समजले असे फायदे तोटे देउन प्रत्येकाचे जिवनमान बदलून जगण्याची नवी दिशा उर्जा विचार संयम कसे व कशासाठी जगायचे याघे साक्षात ज्ञान दिले
    वास्तव फार छान आणी मार्मिक शब्दात व्यक्त केले
    धन्यवाद
    🌹🌹👌👌👍👍🌹🌹

    ReplyDelete
  14. छान आहे तुझ लिखाण ...आत्ता पाहू आपण किती बोध घेतो या कोरोणा कडून.

    ReplyDelete