Tuesday, 26 January 2021

सांधा

आपली मुलं खूप मोठी व्हावीत ही सर्वच मोठ्यांची इच्छा असते. हीच मुलं मोठ्यांच्यात वावरताना मात्र छोट्या मुलांसारखीच वागावीत, त्यांनी लहानांना शोभणारी मिश्किल वर्तने करावीत, असाही त्यांचा गमतीशीर हट्ट असतो. मोठ्यांच्या बैठकीत त्यातल्या त्यात एखादं समजूतदारपणाची कडा असणारं काही भाष्य त्यांनी केलंच तर मोठ्यांचे डोळे विलक्षण मोठे होतात. अर्थात, मोठ्यांसमोर (त्यांच्या तुलनेने) लहान असलेल्यांनी तोंड उघडू नये, या विचारात काही वावगे आहे असे मला म्हणायचे नाही. पण खूपदा "आम्ही मोठे आणि तुम्ही 'अजूनही' छोटेच !" या गळाचेपीत या छोट्यांचे भाव आणि स्वर दोन्ही दडपले जातात ! त्यांना हवी ती लय सापडत नाही आणि तुम्ही छोटे ते कायम छोटेच राहणार हेही बजावलं जातं. बऱ्याचदा या छोटे-मोठेपणात 'वय' हाच प्रमुख वर्चस्व गाजवतो आणि एकाद्या चर्चेतील खरेखोटेपणाच्या तथ्यापेक्षा मोठेपणातील 'मी'पणा हेकेखोरी करताना दिसतो.

आपणास आपल्या आईशी केव्हाही जवळीक साधता येते, वडिलांशी मात्र तसे नसते, त्यांच्याशी आधी खूप छोटे असताना (कारण आपले बोलच तेव्हा बोबडे असतात त्यांनी कोणाला इजाच होत नाही) आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर (तेही कदाचीत, कुंडलीत योग्य असतील तर) जवळ येता येते, मोकळेपणाने बोलता येते. मधल्या काळात आपल्या जीभेची गुंडाळी करून ती घश्याच्या आत बांधली तरच ती एकसंध राहते. अशी एक सर्वसाधारण आपल्या आसपासच्या भागातील बहुतांश वर्गाची जनरीत आहे. याला अपवाद नाहीत अश्यातला काही भाग नाही, बड्या घराच्या मुलांना हि मुभा मिळते. हा मधला काळ मूग गिळून काढल्यानंतर काही मुले ठराविक वयात आपल्या वडिलांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात. मित्र नात्याने त्यांच्यासमोर बंद तोंड उघडू पाहतात. यावेळी मात्र मोठ्यांचे वय आणि मान यांनी फार मान वर काढली नाही तरच तिथे चर्चा रंगते आणि संवाद होतो. नाहीतर यातील शुल्लक गोष्टी वयस्क अहंपणाच्या जिव्हारी लावून घेऊ शकतात आणि चर्चेऐवजी तंटा होऊ शकतो. वयस्क म्हणजे परिपूर्ण हि परिभाषा असलेल्या मोठ्यांना लहानांनी कसलेही शहाणपण शिकवलेले पचत नाही. मोठ्यांचे मोठेपण आतून कमकुवत असू शकते, मोठेपणाला इजा सहन होत नाही. काही मोठ्यांशी मैत्री होणे अशक्यच असते कारण मैत्रीपूर्ण संवादासाठी धरती एक असावी लागते. काही हुशार वडील ठराविक वयानंतर ती स्वतःहून करून घेतात. खूपजनांना ते जमत नाही, अश्या हट्टी वडिलांना कोल्हापुरी भाषेत 'खवट' आणि पुणेरी भाषेत 'कडू' संबोधले जाते, अर्थात त्यांच्या माघारी !

आयुष्याचा गाडा ओढत असताना आपली मुले एव्हाना बऱ्यापैकी मोठी झाली असावीत, हे कित्तेकदा दुर्लक्षित होते. त्यांच्या विचारांना अन स्वप्नांना एखादी पालवी फुटली आहे का, ती पालवी कशाची आहे, त्याचे रोप होऊ शकते का, खतपाणी घालण्यायोग्य असेल तर त्याला आधार द्यावा का ? कि आपल्या संपूर्ण आयुष्यभराच्या संस्कारांनी आपल्या दृष्टिकोनाचा जो साचा तयार झाला आहे त्यातूनच त्यांच्याकडे पाहत बसावे ? आपल्याच साच्याप्रमाणे त्यांना घडवण्याची धडपड, या साच्याच्या पलीकडचे जे आहे ते चुकीचेच असावे ? हा साचा इतका भक्कम असतो कि तो बदलण्यापेक्षा मुलांना ठोकून चेपवणं सोपं जातं. ते दबावापायी खूपदा या साच्यात मावतातही, पण त्यांचे चेप काही केल्या आयुष्यभर जात नाहीत. मग सळसळत्या वयात आल्यानंतर हेच चेप टेंगूळ बनून बाहेर येतात. यावेळी मात्र मोठ्यांना माया कमी झाल्याची जाणीव होते आणि दोन विश्वे एकमेकात मिसळली जात नाहीत.

आपल्या मुलांना लहान घोषित करत लहानच ठेवण्यापेक्षा, योग्यवेळी आपल्या अनुभवी डोळ्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या कुवतीची, आत्मनिर्भरतेची एखादी परीक्षा करून पाहिली गेली, ठराविक वेळी त्यांना प्रपंचातील महत्वाचे प्रश्न, निर्णय, आपत्ती यातील सल्लामसलतीत शामिल केले गेले, यातून त्यांचा वेळचे वेळी खांदा तपासाला गेला, ठराविक वयानंतर त्यांना बाबू, पप्पू, छकूली किंवा चमू म्हणायचे सोडून दिले, त्यांना फक्त समोरच्यासारखं किंवा त्यापेक्षा वरचढ बनायचे आहे, हे घोकून सांगत बसण्यापेक्षा, त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन कसा विकसित होऊ शकतो, याकडे लक्ष दिले गेले, समोरच्या चार चौकटी म्हणजेच काही विश्व नाही, विश्वाचा विस्तार खूप मोठा आहे, ते कापतील तेवढे अंतर थोडे आहे, आपले काम फक्त त्यांच्या पंखांना बळकटी देण्याचे आहे, त्यानंतरची गगनभरारी ही सर्वस्वी त्यांचीच जबाबदारी आहे, हे जाणले तर खऱ्या अर्थाने छोट्यांना मोठे करण्यात यश येऊ शकेल.

असो! हि लहान तोंडी मोठा घास घ्यायची लहर मला आज कशी काय आली काही कल्पना नाही! Computer आणि keyboard काही बोलायला किंवा व्यक्त ह्यायला अटकाव करत नाहीत हेही एक कारण असावे. मोठेपणा फक्त वय व अधिकार यांना बांधून न ठेवलेल्या मोठ्यांना या लेखाचा आणि वयात आलेल्या त्यांच्या लेकाचा फारसा त्रास होऊ नये !